loader
Foto

पोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अमेरिकेत जाळपोळ, हिंसाचार

मिनियापोलिस: अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतर हिंसाचार उफाळला आहे. वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी युएस नॅशनल गार्ड बोलवण्यात आले आहेत. सोमवारी पोलीस तपासणीच्या वेळेस ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयर्डचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याची हत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्थानिक माध्यमांनी, वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जच्या मृत्यूनंतर संतापलेल्या जमावाने पोलिस स्टेशनची तोडफोड केली. त्याशिवाय परिसरात असलेल्या वाहनांना आग लावण्यात आली. वाढत्या हिंसाचाराला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. हिंसाचार करणाऱ्यांनी काही दुकांनाना लुटले असून तोडफोड केल्याचे वृत्त आहे. मिनियापोलिसशिवाय शिकागो, लॉस एंजिल्स आणि मेम्फिसमध्ये आंदोलन करण्यात आले.

 

सोमवारी, एका प्रकरणात पोलिसांकडून तपासणी सुरू होती. पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयर्डला कारमधून बाहेर उतरण्यास सांगितले. जॉर्ज फ्लॉयर्ड आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. या दरम्यान पोलिसांनी जॉर्जला जमिनीवर पाडले. या दरम्यान एका पोलिसाने त्याच्या मानेवर पाय ठेवला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.

मिनेसोटाचे राज्यपाल टिम वाल्ज यांनी गुरुवारी मिनियापोलिस आणि सेंट पॉलचे महापौर यांच्या विनंतीनंतर नॅशनल गार्ड यांच्या तैनातीसाठी मंजुरी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मिनियापोलिसमध्ये 'पीसटाइम' आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, जॉर्ज फ्लॉयर्डच्या मृत्यूप्रकरणी चार पोलिसांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते गॅरेट पार्टन यांनी दिली.

Recent Posts