loader
Foto

हिवाळी अधिवेशन: अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली निवास समिती

नागपूर: राज्यात मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांच्या पत्रावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा हिंदुत्वाचा नवा वाद रंगला असला तरी, हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेकडेही सरकारने लक्ष दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय निवास व्यवस्था समिती स्थापन केली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात नियोजित आहे. करोनाच्या संकटामुळे अधिवेशन व्हावे आणि होऊ नये, अशा बाजूने काही नेते, पक्ष व संघटना आहेत. असे असले तरी, दोन आठवड्याचा कार्यक्रम निश्चित केल्यानंतर आता सरकारने यापूर्वीच्या समितीत थोडे फेरबदल केले. अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आणि सोयी-सुविधांची देखरेख समितीच्या माध्यमातून होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानमंडळाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त सदस्य सचिव आहेत.
या समितीच्या माध्यमातून अधिवेशनाची तयारी करण्यात येईल. वाहने अधिग्रहित करणे, भाड्याने घेणे, मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या कार्यालयास लागणारे साहित्य, विमान, रेल्वे आरक्षण, दूरध्वनी व्यवस्था, टपाल ने-आण, संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती, निवास व्यवस्थेचा आराखडा तयार करणे, निवास व्यवस्थेत बदल वा अतिरिक्त मागणी आदी अनेक मुद्यांवर समिती निर्णय घेईल. अधिवेशनाच्या एक महिना आधी म्हणजे दिवाळीपूर्वी समितीची बैठक अपेक्षित आहे. त्यात चर्चा करून व्यवस्थेच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

Recent Posts