loader
Foto

नागपूरला दिलासा! करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या होतेय कमी, बरे होण्याचे प्रमाण वाढले

नागपूरः शहर आणि जिल्ह्याभोवती करोना विषाणू संक्रमणाच्या साखळीचा विळखा सलग आठव्या महिन्यातही कायम आहे. सुदैवाने आठवडा सुरू झाल्यापासून विषाणू बाधितांची शृंखला सैल होत आहे. तर दुसऱ्या बाजुला समाधानाची बाब म्हणजे विषाणू लागण झाल्यानंतर उपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९८ नव्या बाधितांची भर पडली तर १४२५ जण लक्षणातून बाहेर पडल्याने सुखरूप घरी परतले. या घडामोडीत आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २३ जणांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. आज आजाराची बाधा होऊन दगावलेल्यांमध्ये १५ जण शहराच्या, ३ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर ५ जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते.

करोनाची बाधा झाल्याच्या संशयातून आज संपूर्ण जिल्ह्यात ७७८५ संभाव्य रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. यातील ४५५६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. तपासलेल्या एकूण संशयितांपैकी ६८८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना करोनाची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. तर ८९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील विविध निदान केंद्रांमध्ये नव्याने करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झालेल्यांपैकी खासगी लॅबमधून ३९५, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ३४२, मेयोतून ६७, एम्समधून ३९, निरीतून ३५, माफ्सूतून १९ तर मेडिकलमधून केवळ एकाच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोनाचा अंश सापडला. त्यामुळे आतापर्यंत विषाणू बाधित झालेल्यांची संख्या आता ८३,१०५ पर्यंत पुढे सरकली आहे.

आजारमुक्त होऊन आज घरी परतलेल्या १४२५ जणांपैकी ११३३ जण शहरातील तर २९२ जण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आजवर जिल्ह्यात करोना विषाणूचे संक्रमण झालेले ७०,७६७ जण आजारमुक्त झाले आहेत. सरासरी हा रिकव्हरी दर ८५ टक्क्यांवर गेला आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्याच्या विविध कोव्हिड केअर सेंटर्समध्ये ९६५६ अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मंगळवारचे पॉझिटिव्ह- ८९८
आजचे आजारमुक्त- १४२५
एकूण करोनाबाधित- ८३,१०५
एकूण आजारमुक्त-७०,७७६
अॅक्टिव्ह करोनाबाधित- ९६५६
आजचे निगेटिव्ह रुग्ण- ६४२८

Recent Posts