loader
Foto

यवतमाळ हॉटस्पॉटच्या दिशेने

नागपूर: विदर्भातील सात जिल्हे हे हवामान बदलाच्या दृष्टीकोनातून हॉटस्पॉट म्हणून तयार होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी जागतिक बँकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. गेल्या काही वर्षातील मान्सून काळातील पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेतल्यास यवतमाळ, वाशीम आणि भंडारा या जिल्ह्यांची वाटचाल खरोखरीच हॉटस्पॉटच्या दिशेने होत असल्याचे दिसून येते.

यवतमाळचा विचार केल्यास शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण याच जिल्ह्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्याने सातत्याने दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना केला आहे. येथे २०१४मध्ये २१ टक्क्यांची, २०१५मध्ये २२ टक्क्यांची, २०१७मध्ये ३४ टक्क्यांची, २०१९मध्ये ३० टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. या वर्षीचा मान्सून अद्याप संपलेला नसला तरीसुद्धा निम्मा सप्टेंबर उलटल्यानंतर २८ टक्क्यांची तूट भरून निघण्याची फारशी आशा नाही. यंदा वाशीम जिल्ह्यात ७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली. मात्र २०१४मध्ये ३२ टक्क्यांची, २०१५मध्ये २१ टक्क्यांची, २०१७मध्ये २८ टक्क्यांची, २०१९ मध्ये २० टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. यंदा नुकतीच सरासरी गाठलेल्या भंडाऱ्यात २०१४मध्ये २० टक्क्यांची, २०१६मध्ये २२ टक्क्यांची तर २०१७मध्ये २७ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. याबाबत हवामानशास्त्राचे अभ्यासक तसेच भूशास्त्रज्ञ सुरेश चोपणे म्हणाले, 'गेल्या २० वर्षांपासून हा बदल होत असल्याचे दिसून येते. अनेकदा एखाद्या जिल्ह्याने सरासरी गाठल्याचे दिसून येते. मात्र पावसाचे दिवस कमी झालेत आणि अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वाभाविकच शेतीचे गणित बिघडते. यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांबाबत हे प्रकर्षाने जाणवून येते. ही हॉटस्पॉटचीच लक्षणे आहेत.'

Recent Posts