loader
Foto

कांद्यावरून सरकारचा वांधा! भाजपचे खासदार उदयनराजेही विरोधात उतरले

कांदा निर्यातीवर बंदी लादण्याच्या मोदी सरकारच्या अनपेक्षित निर्णयाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना आता सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही त्या विरोधात बोलू लागले आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिलं असून हा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याचं म्हटलं आहे.

'केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा करोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्याना उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्याना दिलासा द्यावा,' अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

'कांदा उत्पादक शेतकरी हा गरीब आहे. करोना काळात संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. देशाला अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभर कांद्याला मोठी मागणी आहे. अशा वेळी निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो. आज चांगला भाव मिळत असताना निर्यातबंदीचा निर्णय घेणे चुकीचं आहे,' हे उदयनराजे यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

Recent Posts